जुन्या वादातून गोळीबार; अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नौपाडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक करून गुन्हा उघडकीस आणला. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल व चोरीस गेलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
२७ मार्च रोजी पहाटे सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील धर्मवीर कट येथील पेट्रोल पंपावर ही घटना घडली. इंजमाम अमीरुद्दीन सिद्दीकी (२६) हे त्यांच्या अॅक्टीव्हा दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आले असता आरोपी जबीउल्ला शफीकुररहमान खान (३९) याने त्यांच्यावर दोन राउंड गोळीबार केला. दोन महिन्यांपूर्वी वडिलांबद्दल केलेल्या अपशब्दांमुळे दोघांमध्ये वाद सुरू होता. त्याचाच राग मनात ठेवून आरोपीने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोळीबारानंतर आरोपीने फिर्यादीची दुचाकी जबरदस्तीने पळवून नेली तसेच त्यांच्या मैत्रिणीला बंदुकीचा धाक दाखवला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर आरोपीने मोबाईल बंद करून लपून बसल्याने त्याला पकडणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले होते. मात्र, गुप्त माहितीच्या आधारे वागळे इस्टेट परिसरात सापळा रचून २९ मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली. अंगझडतीदरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले देशी पिस्तूल व चोरीची अॅक्टीव्हा जप्त करण्यात आली.
दरम्यान, आरोपीविरुद्ध यापूर्वीही खूनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, आर्म अॅक्टसह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने आरोपीला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त संभाजीराव जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मंगेश भांगे व त्यांच्या पथकाने केली.