मिरा-भाईंदरांसाठी आनंदाची बातमी; मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो ३ एप्रिल पासून धावणार

Spread the love

मिरा-भाईंदरांसाठी आनंदाची बातमी; मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो ३ एप्रिल पासून धावणार

योगेश पांडे / वार्ताहर

मिरा-भाईंदर – बहुप्रतिक्षित दहिसर-मिरा-भाईंदर ७ अ मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्या सेवेत येण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन येत्या ३ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. तशी माहिती आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून शनिवारी देण्यात आली. या मेट्रो प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर मधून थेट अंधेरीपर्यंत मिरा-भाईंदरकरांना प्रवास करता येणार आहे. मिरा-भाईंदरांना लगत असणाऱ्या मुंबईत रेल्वेने जायचे झाल्यास वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे तर रस्ते मार्गावर वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातून दिलासा देण्याच्या दृष्टीने मेट्रो मार्गीका उभारून ती मुंबईशी जोडण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार राज्य सरकारने २०१८ मध्ये दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो ९ अ प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर २०१९ मध्ये मेट्रोचे प्रत्यक्षात काम हाती घेण्यात आले होते.

दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यात एमएमआरडीएकडून या मेट्रो मार्गीकेचे काम केले जात आहे. यातील पहिल्या टप्प्याचे अधिक तर काम मे २०२५ मध्ये पूर्ण झाले होते. त्यानंतर मेट्रो चाचणीचे काम हाती घेण्यात आले होते. ती पूर्ण होत आवश्यक परवानग्या मागील महिन्यात मिळाल्या होत्या. त्यानंतर मेट्रो सेवेत येणे अपेक्षित असले तरी उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ मिळत नसल्याने ते रखडल्याची चर्चा होती.

मागील आठवड्यात मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील मेट्रोच्या कामाचा पाहणी करत आढावा घेतला होता. त्यानंतर आता अखेर ३ एप्रिलचा मेट्रो उद्घाटन कार्यक्रमाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहेत. त्यासाठीची आवश्यक सर्व तयारी एमएमआरडीकडून पूर्ण झाली असल्याची माहिती आमदार मेहता यांनी दिली.

हा प्रकल्प सेवेत आल्यानंतर मिरा-भाईंदरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेट्रो मार्गीकेने अंधेरीला जायचे झाल्यास सध्या मिरा-भाईंदर होऊन दहिसरला जावे लागत आहे. यादरम्यान दहिसर टोल नाक्यावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागतो. मात्र, मेट्रो सेवेत आल्यानंतर मिरा-भाईंदरमधील काशिगाव पांडुरंग वाडी, मिरा गाव आधी तीन स्थानकातून थेट अंधेरी गाठता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon