कोडवर्डमधून नेत्यांची नावे लपवली? भोंदूबाबा अशोक खरातला पुन्हा ३ दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love

कोडवर्डमधून नेत्यांची नावे लपवली? भोंदूबाबा अशोक खरातला पुन्हा ३ दिवसांची पोलीस कोठडी

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक : बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आरोपीच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्याची पुन्हा ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. न्यायमूर्ती एम. व्ही. भराडे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन हा निर्णय दिला. १८ मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या खरातला यापूर्वीही दोन वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेल्या युक्तिवादानुसार, गेल्या दहा दिवसांपासून कोठडीत असलेला आरोपी तपासात सहकार्य करत नाही. विशेष तपास पथकाने न्यायालयाला सांगितले की, आरोपीच्या मोबाईलमधील डेटा पुनर्प्राप्त करण्यात आला असून त्याचा सखोल तपास अद्याप सुरू आहे. या डेटामध्ये अनेक राजकीय व्यक्तींची नावे कोडवर्ड किंवा बनावट नावांनी सेव्ह केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या बाबींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक तपासासाठी पाठवलेले मोबाईल आणि लॅपटॉप नुकतेच प्राप्त झाले आहेत. आरोपीवर महिलांशी गैरवर्तन आणि फसवणुकीचे गंभीर आरोप असून, त्याच्या जंगम मालमत्तेचा तसेच पीडित महिलांना दिल्या जाणाऱ्या कथित द्रव्याचा तपास करणे बाकी आहे. अनेक पीडित महिला समोर येत असल्याने तपासाचा विस्तार वाढत असल्याचेही नमूद करण्यात आले. यानंतर न्यायालयाने आरोपीला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी या मागणीला विरोध करताना पोलिसांनी नव्याने कोणतीही ठोस कारणे मांडलेली नाहीत, असा दावा केला. पहिल्या रिमांडवेळी सांगितलेलीच कारणे पुन्हा मांडली जात असून, अद्याप महत्त्वाचे पुरावे जप्त झालेले नाहीत, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वाढीव पोलीस कोठडीची मागणी फेटाळण्याची विनंती बचाव पक्षाने केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon