कुटुंबाचा क्षणिक निष्काळजीपणा मुलाच्या जीवावर बेतला; स्विमिंग पूलमध्ये बुडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – आनंदाच्या सहलीवर विरजण घालणारी अत्यंत हृदयद्रावक घटना अलिबाग तालुक्यातील नागाव येथे घडली. स्विमिंग पूलमध्ये बुडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबाचा क्षणिक निष्काळजीपणा मुलाच्या जीवावर बेतला. निष्पाप जीवाच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
रोहित चंद्रकांत पाटील (३२) हे त्यांची पत्नी अस्मिता, मुलगा रिशांक आणि मेहुणीसह नागाव येथे मित्र स्वप्नील वसंत शिंदे यांच्या खासगी स्विमिंग पूलवर गेले होते. सहलीचा आनंद घेत सर्व जण काही वेळ स्विमिंग पूलमध्ये पोहत होते. त्यानंतर कपडे बदलण्यासाठी सर्वजण रूममध्ये गेले.
रोहित पाटील कपडे बदलण्यासाठी आत गेले असताना त्यांचा मुलगा रिशांक काही वेळ बाहेरच थांबला होता. मात्र, काही क्षणातच तो नजरेआड झाला. कपडे बदलून बाहेर आल्यानंतर रोहित पाटील यांनी मुलाचा शोध घेतला असता तो कुठेच दिसून आला नाही. अखेर स्विमिंग पूलमध्ये पाहिले असता रिशांक हा पूलच्या तळाशी बुडालेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तातडीने त्याला पाण्याबाहेर काढून जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, सुमारे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागाव परिसर हादरला आहे. आनंदाच्या क्षणातच काळाने झडप घालत एका निष्पाप जीवाचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्विमिंग पूल परिसरात सुरक्षेची पुरेशी उपाययोजना होती का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पालकांनी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. क्षणिक निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचे हे दुर्दैवी उदाहरण ठरले आहे.