भारतीय नववर्ष स्वागत यात्रेत ठाणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि कोकणेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय नववर्ष स्वागत यात्रा गुरुवारी ठाणे शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी कोपिनेश्वर मंदिरात पालखी पूजन करून यात्रेला प्रारंभ झाला. स्वागताध्यक्ष डॉ. धनश्री लेले यांच्यासह विविध मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या शोभायात्रेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळकर, महापालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ढोल-ताशांचा गजर, विविध लोककलांचे सादरीकरण, एरियल सिल्क, मल्लखांब, जिमनॅस्टिकची प्रात्यक्षिके, पारंपरिक वेशभूषेतील सायकल रॅली, महिलांची बाईक रॅली आणि विविध संस्थांच्या पदयात्रांनी यात्रेला रंगत आणली. जांभळी नाका ते दगडी शाळा या मार्गावर पालखीवर रांगोळीच्या पायघड्या अंथरून स्वागत करण्यात आले, तर चिंतामणी चौक, हरिनिवास सर्कल आणि गोखले रोड येथे पुष्पवृष्टी करण्यात आली.
यंदा प्रथमच तृतीयपंथी समाजाचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला. त्यांनी समानतेचा संदेश देत यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला. कर्नाटक सांस्कृतिक मंच, वनवासी कल्याण आश्रम, एकलव्य क्रीडा मंडळ यांसह विविध संस्थांनी पारंपरिक आणि सामाजिक विषयांवरील सादरीकरणातून उपस्थितांचे लक्ष वेधले.
पर्यावरण जनजागृती, आरोग्यविषयक संदेश, तसेच विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे चित्ररथ हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांसह राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या चित्ररथांचाही यात समावेश होता.
उत्साह, सांस्कृतिक वैविध्य आणि सामाजिक संदेश यांचा संगम साधणारी ही स्वागत यात्रा ठाणेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.