सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात;
आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
खोपोली – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरच मृत्यूने घाला घातल्याची धक्कादायक घटना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर घडली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या भीषण अपघातामुळे एक्सप्रेसवे पुन्हा एकदा ‘डेथ ट्रॅप’ ठरला असून, केवळ दोन दिवसांत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुरूवारी सकाळी लोणावळ्याजवळ झालेल्या या भीषण अपघातात आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी सकाळी तीन तरूण लोणावळ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. या वेळी त्यांची पोलो कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ओमकुमार बोरसे (२३), लय भारत (२२) आणि श्रेयांश शर्मा या तीन तरुणांचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. हे तिघेही पवई येथील आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण काल मुंबईहून कारने लोणावळा येथे गेले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ते पुन्हा मुंबईकडे परतत असताना एक्सप्रेसवेवर कार रेसिंग सुरू झाले. ओव्हरटेकच्या नादात पोलो कार पलटी होऊन हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलीस, ‘देवदूत’ यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य ॲम्ब्युलन्स आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी मोठ्या शिताफीने कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून काही तासांनंतर वाहतूक सुरळीत केली. सलग घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे “एक्सप्रेसवेवर प्रवास करणे सुरक्षित आहे का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.