वृत्त प्रकाशित न करण्यासाठी १ लाखांची मागणी; युट्यूब चॅनेल चालकावर खंडणीचा गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
मिरा-भाईंदर : “On Record Mira Bhayandar” या युट्यूब चॅनेलचा चालक शब्बीर शेख याच्याविरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नया नगर पोलीस ठाण्यात याबाबत एफ.आय.आर. नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने एका विवाहित महिलेकडून तिच्याविरोधातील वृत्त प्रकाशित न करण्याच्या बदल्यात सुमारे १ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच, संबंधित महिलेसह तिच्या मुलीलाही धमकावल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष असून, लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.