कला की काळा धंदा? सोलापूर ग्रामीण पोलिसांची टेंभुर्णीत धडक कारवाई; २५ महिलांची सुटका

Spread the love

कला की काळा धंदा? सोलापूर ग्रामीण पोलिसांची टेंभुर्णीत धडक कारवाई; २५ महिलांची सुटका

पोलीस महानगर नेटवर्क

सोलापूर : सांस्कृतिक उपक्रमांच्या आडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी भांडाफोड केला आहे. टेंभुर्णी (मोडनिंब) येथील ‘स्वरांजली कला केंद्रा’वर मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात तब्बल २५ महिलांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी राहुल आत्राम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून अचानक धाड टाकताच, कला केंद्राच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आला. या ठिकाणी महिलांना जबरदस्तीने आणून अनैतिक व्यवसायात ढकलले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी केंद्राचा मालक, व्यवस्थापक तसेच संबंधित लॉज चालकासह एकूण सहा जणांना ताब्यात घेतले. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी अनेकजणी परराज्य आणि परजिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे ‘कला केंद्र’ या संकल्पनेलाच काळिमा फासला गेला असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामागील मोठे जाळे उघड होण्याची शक्यता असून, तपास अधिक व्यापक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon