चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोरच घडला थरार
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील उंबर्डे परिसरात घडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार दाम्पत्याच्या नऊ वर्षांच्या मुलाच्या डोळ्यासमोर घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर (२५) असे मृत महिलेचे नाव असून विशाल साहेबराव भुतकर (३०) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल आणि अर्चना यांच्यात गेल्या काही काळापासून चारित्र्यावरून सतत वाद होत होते. या वादातून दीड वर्षांपासून दोघे वेगळे राहत होते. विशाल हा मोठ्या मुलासह नाशिक येथे राहत होता, तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे परिसरात केडीएमसी गार्डनजवळील एका चाळीत राहत होती. घरकाम करून ती आपल्या पाच वर्षांच्या मुलीचा सांभाळ करत होती.
दरम्यान, बुधवारी (११ मार्च) विशाल हा आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन नाशिकहून कल्याणला अर्चनाला भेटण्यासाठी आला. जुने वाद विसरून पुन्हा एकत्र संसार करूया, अशी विनंती त्याने अर्चनाला केली. मात्र अर्चनाने या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
संतापाच्या भरात विशालने आपल्याजवळील चाकू काढून अर्चनावर सपासप वार केले. हा थरार नऊ वर्षांच्या मुलासमोरच घडला. गंभीर जखमी झालेल्या अर्चनाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपी विशाल तेथून पसार झाला आणि थेट नाशिकला गेला. तेथे पोलिसांसमोर हजर होत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नाशिक पोलिसांनी तत्काळ कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.