मांजर–पोपटावरून शेजाऱ्यांत मारहाण; प्रकरण पोलीस ठाण्यात

Spread the love

मांजर–पोपटावरून शेजाऱ्यांत मारहाण; प्रकरण पोलीस ठाण्यात

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : मांजर आणि पोपटावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना शहरातील ताडीवाला रोड परिसरात घडली. या प्रकरणी मांजरीचा मालक दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक सिंग हे ताडीवाला रोड परिसरात कुटुंबासह राहतात. त्यांनी आपल्या घरासमोर पिंजऱ्यात पोपट पाळला आहे. त्यांच्या शेजारी राहणारे दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांनी मांजर पाळले असून ते परिसरात मोकळेपणाने फिरत असते. हे मांजर वारंवार सिंग यांच्या घरासमोर येऊन पोपटाच्या पिंजऱ्याजवळ फिरत असल्याने त्यांना त्रास होत होता.

काही वेळा मांजरीने पोपटाचा पिंजरा ढकलल्याच्या घटना घडल्याने सिंग यांनी पोताबत्तोनी यांना मांजरीवर लक्ष ठेवण्याची विनंती केली होती. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात आले.

घटनेच्या दिवशी मांजरीने पुन्हा एकदा पोपटाचा पिंजरा पाडल्याने सिंग यांनी पोताबत्तोनी यांना याबाबत जाब विचारला. यावरून दोघांमध्ये सुरुवातीला तोंडी वाद झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यही या वादात सहभागी झाले आणि परिस्थिती चिघळली. काही वेळातच दोन्ही बाजूंच्या व्यक्तींमध्ये धक्काबुक्की व मारहाण झाली. या घटनेत अभिषेक सिंग यांना दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी सिंग यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोताबत्तोनी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये एवढा मोठा वाद निर्माण होऊन तो मारहाणीत बदलल्याने परिसरात या घटनेची चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon