पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या कारवाईत वाहन चोरीच्या एकूण ३४ गुन्ह्यांचा उलगडा; उच्चशिक्षित चोरट्या कडून ४० बाईक जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – उच्चशिक्षित तरुणानेच मोटारसायकल चोरीचा व्यवसाय सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट- २ ने कारवाई करत तब्बल २१ लाख ६६ हजार रुपये किंमतीच्या ४० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाहन चोरीचे एकूण ३४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आशफाक इस्माईल पठाण (३२) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीने बीएपर्यंत शिक्षण घेतलेले असूनही तो मोटारसायकल चोरी करत असल्याचे तपासात समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखांना विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने परिसरातील सुमारे ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयिताचा माग काढला.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आशफाक पठाण याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २१ लाख ६६ हजार रुपये किंमतीच्या ४० मोटारसायकली जप्त केल्या. तपासादरम्यान आरोपी चोरीच्या मोटारसायकली या फायनान्स कंपनीचे हप्ते थकलेली वाहने असल्याचे सांगून स्वस्त दरात विकत असल्याचे उघड झाले. या प्रकरणात चोरीच्या मोटारसायकली खरेदी केल्याप्रकरणी मुकुंद उद्धवराव हारदास (२५) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मध्यस्थीच्या माध्यमातून तो २० ते २५ हजार रुपयांना या दुचाकी विकत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला स्लेंडर मोटारसायकलींची विशेष आवड असल्यामुळे सुरुवातीला त्याने एक मोटारसायकल चोरी केली. त्यानंतर त्याला चोरीची सवय लागली आणि मागील दोन ते तीन वर्षांपासून तो पुण्यात येऊन मोटारसायकली चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून विविध वाहनांच्या अनेक चाव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीविरुद्ध यापूर्वीही वाहन चोरीचे १० गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-२ करत आहे.