राज्यसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रातील सहा जागांबाबत सस्पेन्स कायम
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली : राज्यसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्रातील सहा जागांसाठी एकाही उमेदवाराच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील संभाव्य उमेदवारांबाबत उत्सुकता आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या नितीन नबीन यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. ते बिहारमधून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे जेपी नड्डा यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेत प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
बिहारसह देशातील दहा राज्यांमधील एकूण ३७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. बिहारमधील पाच जागांसाठी २६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून, नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख ५ मार्च आहे. ३ आणि ४ मार्च रोजी होळीची सुट्टी असल्याने उमेदवारांसमोर वेळेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत बिहारमधून नितीन नबीन यांच्यासह शिवेश कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आसाममधून तेराश गोवाला आणि जोगेन मोहन, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा, हरियाणामधून संजय भाटिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच ओडिशामधून प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आणि सुजित कुमार, तर पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
मात्र, पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावाचा उल्लेख नसल्याने राज्यातील सहा जागांवर कोणाला संधी मिळणार, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम असून, पुढील यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.