भांडुपमध्ये ८ वीतील विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या करून मृतदेह विहार तलावात फेकला; तीन अल्पवयीनांची कबुली, पोलिस तपासात बनावाचा पर्दाफाश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील भांडुप परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय सिद्धार्थ अजय लोंढे याची त्याच्याच मित्रांनी मारहाण करून हत्या केल्याचे उघड झाले आहे. पुरावा लपवण्यासाठी मृतदेह विहार लेक येथे फेकण्यात आल्याची माहिती भांडुप पोलिसांकडून देण्यात आली. सिद्धार्थ हा तुळशेतपाडा, भांडुप (पश्चिम) येथे कुटुंबासोबत राहत होता. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे तीन वाजता तो खेळायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला; मात्र रात्री उशिरापर्यंत परतला नाही. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतल्यानंतर भांडुप पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तो अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी विहार तलावात एका मुलाचा मृतदेह आढळून आला. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. सुरुवातीला बुडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र शवविच्छेदन अहवालात फुफ्फुस आणि पोटात पाणी नसल्याचे, तसेच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत व अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे नमूद झाल्याने हत्येचा संशय बळावला.
तपासादरम्यान सिद्धार्थला शेवटचे त्याच परिसरातील तीन मित्रांसोबत पाहिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला ‘पोहायला गेलो असताना तो बुडाला’ असे सांगण्यात आले.मात्र स्वतंत्र चौकशीत तिघांनीही मारहाण करून त्याला तलावात फेकल्याची कबुली दिली. दादागिरीच्या वादातून रागाच्या भरात काठीने मारहाण केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान आतापर्यंत या प्रकरणी १४ ते १५ वयोगटातील तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. सबंधित प्रकरणामध्ये आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.