कलेक्टर कार्यालयासमोर २२ तोळ्यांची लूट; १२ तासांत सातारा पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुरिअर कर्मचाऱ्यावर हल्ला करून २२ तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना अवघ्या १२ तासांत जेरबंद करण्यात सातारा शहर पोलीस यांना यश आले. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे महाराष्ट्र–मध्य प्रदेश सीमेपर्यंत पाठलाग करत शिरपूर येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात कुरिअर कंपनीतीलच एका कर्मचाऱ्याचा कटात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ही घटना घडली. लक्ष्मी कुरिअर कंपनीचा कर्मचारी कोल्हापूरहून आलेल्या ट्रॅव्हल्समधून पुण्याकडे जाण्यासाठी २२ तोळ्यांचे दागिने घेऊन थांबला असता, स्विफ्ट कारमधून आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर जबर मारहाण करत दागिने लुटले आणि पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मार्ग निश्चित करण्यात आला. संशयित अहिल्यानगरमार्गे धुळ्याकडे जात असल्याचे स्पष्ट होताच, सीमावर्ती भागात शिरपूर पोलिसांना सतर्क करण्यात आले.
महाराष्ट्र–मध्य प्रदेश सीमेवर शिरपूर येथे सापळा रचून संयुक्त कारवाईत पाचही आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून लुटलेले २२ तोळे सोने आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. अभिषेक शिकलगार, अंकुश जाट, अनुज दिवाकर, पंकज राठोड आणि अजय राठोड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत.
धाडसी लूटप्रकरणाचा छडा लावत अवघ्या काही तासांत आरोपींना अटक केल्याबद्दल सातारा शहर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.