विश्वासघाताचा हाय-प्रोफाइल कट; नाशिकच्या लिकर लॉबीत खळबळ
मंगल ब्रँडी हाऊस प्रकरणाची गुन्हे शाखेकडून कुंडली तपासणी
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक : ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच मालकाच्या साम्राज्यावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या मद्यविक्री क्षेत्रात उघडकीस आला आहे. वयोवृद्ध मद्यव्यावसायिकाच्या इंग्रजी भाषेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तब्बल ७५ टक्के भागीदारी हडप केल्याचा आरोप व्यवस्थापकावर करण्यात आला असून, या प्रकरणाने नाशिकच्या लिकर लॉबीत मोठी खळबळ उडाली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाचा ताबा नाशिक गुन्हे शाखाने घेतल्याने या व्यवहारामागील साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फिर्यादी दीपक श्रीधर पाटील (६८, रा. येवला, जि. नाशिक) यांचे पंचवटीतील आडगाव नाका परिसरात ‘मंगल ब्रँडी हाऊस’ नावाचे वाईन शॉप आहे. वयोमान आणि शारीरिक व्याधींमुळे त्यांनी व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन परिचित अतुल विजय मदन याच्याकडे सोपवले होते. मात्र, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी मदनने व्यवस्थापन करार असल्याचे भासवून इंग्रजीत तयार कागदपत्रांवर पाटील यांची स्वाक्षरी घेतल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात तो भागीदारी करार असल्याचे पुढे निष्पन्न झाले.
तक्रारीनुसार, पाटील यांच्या पत्नी व दोन मुलांच्या संमतीशिवाय कोऱ्या बाँडवर सह्या घेऊन त्यांचे खोटे संमतीपत्र नोटराईज करण्यात आले आणि ते राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात सादर करण्यात आले. चलन भरतानाही संशयिताने स्वतःचा पॅन क्रमांक वापरून मूळ मालक असल्याचे भासवले, असा आरोप आहे.
उत्पादन शुल्कचे गौडबंगाल?
कायद्यानुसार वाईन शॉपच्या भागीदारीत बदल करताना मूळ परवानाधारकाची प्रत्यक्ष उपस्थिती, ओळख पडताळणी आणि चौकशी अनिवार्य असते. मात्र, मूळ मालक अनुपस्थित असताना सादर झालेल्या अर्जावरून ७५ टक्के भागीदारी कशी मंजूर झाली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा प्रकार एकट्या संशयिताचा की विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने घडला, याची चौकशी सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल तपास करत आहेत.
पोलीस आयुक्तांकडे कैफियत
पाटील पिता–पुत्रांनी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवून तपासाला गती दिली आहे. संशयित मदनचे नाशिकमधील मद्यविक्री क्षेत्रातील इतर कनेक्शन्स, तसेच सरकारी कार्यालयांतील संभाव्य एजंट्सची भूमिका तपासली जात आहे. या तपासातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.