ड्युटी व बदलीसाठी ‘हप्ता’ची मागणी; कोपरखैरणेत लाचखोर सुपरवायझर रंगेहात अटक

Spread the love

ड्युटी व बदलीसाठी ‘हप्ता’ची मागणी; कोपरखैरणेत लाचखोर सुपरवायझर रंगेहात अटक

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : ड्युटी लावणे आणि बदलीसाठी दरमहा ‘हप्ता’ मागणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळातील पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नवी मुंबई घटकाने राबविलेल्या सापळा कारवाईत रंगेहात अटक केली. ही कारवाई २७ फेब्रुवारी २०२६ रोजी कोपरखैरणे येथे करण्यात आली.

आरोपी निलेश तुकाराम बढे (वय ४६) हा सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत कार्यरत असून, महावितरण (एमएसईडीसीएल) कोपरखैरणे येथील सुपरवायझर म्हणून त्याच्याकडे सुरक्षा रक्षकांची ड्युटी लावणे, पॉईंट तपासणी, हजेरी ठेवणे तसेच वेतन व बदल्यांबाबत शिफारसी करण्याची जबाबदारी होती.

तक्रारीनुसार, काम सुरळीत ठेवण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे दरमहा १०० रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांकडून मिळून एकूण १,९०० रुपये ‘हप्ता’ देण्याचा दबाव टाकण्यात आला होता. ही रक्कम न दिल्यास गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे किंवा कामावरून काढून प्रतीक्षा यादीत टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यामुळे तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लेखी तक्रार दाखल केली.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०५ वाजता एमएसईबी कॉलनी, सेक्टर १५ येथील सिक्युरिटी चौकीजवळ आरोपीने तक्रारदाराकडून १,९०० रुपये स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले.

कारवाईदरम्यान आरोपीची अंगझडती घेण्यात आली असून, तपासासाठी त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या राहत्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाने सांगितले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे तसेच पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon