लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने ३० लाखांची खंडणी; बोरीवली पोलिसांची सापळा कारवाई, चार जण अटकेत
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने सराफा व्यापाऱ्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना बोरीवली पोलीस ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा क्रमांक ३५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८(५) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, १८ ते २४ फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
पोलिस तपासानुसार, बोरीवली पोलीस ठाणे हद्दीतील एका सराफा व्यापाऱ्याला व्हाट्सअप कॉल व संदेशांद्वारे “आम्ही लॉरेन्स बिश्नोई टोळीमधून बोलत आहोत” असे सांगून धमकावण्यात आले. आरोपींनी ३० लाख रुपयांची खंडणी मागत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
तांत्रिक तपास करत पोलिसांनी फिर्यादीला विश्वासात घेत सापळा रचला. बँक खात्यात पैसे देणे शक्य नसल्याचे सांगून खंडणीची रक्कम सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात प्रत्यक्ष देऊ, असे आरोपींना कळवण्यात आले. त्यानुसार सोने घेण्यासाठी आलेल्या पहिल्या आरोपीला माहिम पश्चिम परिसरात अटक करण्यात आली. रियाजुद्दीन मोहम्मद बशीर (२९) असे त्याचे नाव आहे.
यानंतर पोलिसांनी छापेमारी करत बांद्रा व जोगेश्वरी पश्चिम येथून मोहम्मद फैय्याज मोहम्मद कय्युम मन्सुरी उर्फ सद्दाम (२७), मोहम्मद अश्रफूल कादरी मोहम्मद हासीम अन्सारी (३६) आणि मोहम्मद आरबाज अन्सारी मोहम्मद इजहार अन्सारी (२७) यांना अटक केली. सर्व आरोपी मूळचे वासेपुर, जिल्हा धनबाद, झारखंड येथील असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपींकडून वापरण्यात आलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, व्हाट्सअप कॉलद्वारे संपर्क साधणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुसूदन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-११) संदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (बोरीवली विभाग) संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलिंद नागपुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कुख्यात टोळ्यांची नावे वापरून खंडणी मागणाऱ्यांविरोधात मुंबई पोलीस कठोर कारवाई करत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.