अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजला; भ्रष्टाचार प्रकरणी विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्याच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणामुळे सध्या वातावरण तापले आहे. आता मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणाविरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. यावेळी नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मंगळवारी दुसरा दिवस भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजताना दिसत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईचे पडसाद आज विधानभवनात उमटले. मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, झिरवळ राजीनामा द्या, अशी विरोधकांनी घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
मंगळवारी सकाळपासूनच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक पवित्र्यात दिसले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार सतेज पाटील आणि इतर प्रमुख नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडत आंदोलन केले. यावेळी फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हफ्त्याने, मंत्रालयात एकच हिरवळ, यांचं नाव झिरवळ झिरवळ, भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात खळबळजनक कारवाई झाली. एका प्रलंबित फाईलच्या मंजुरीसाठी एका लिपिकाला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. खुद्द मंत्र्यांच्या दालनापर्यंत भ्रष्टाचाराचे धागेदोरे पोहोचल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयाच्या इमारतीत जर मंत्र्यांच्या डोळ्यादेखत लाच घेतली जात असेल, तर हे सरकार भ्रष्टाचारात किती बुडाले आहे हे स्पष्ट होते. मंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय खालचा कर्मचारी एवढे धाडस करू शकत नाही. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून नरहरी झिरवाळ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली