एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून १०० कोटींचा निधी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य सरकारने शासन निर्णयाद्वारे एसटी महामंडळाला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामुळे राज्यातील सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतनवाढीचे हप्ते जमा होणार आहेत.
एसटी महामंडळाने सरकारकडे ३२५ कोटी रुपयांची मागणी केली होती. थकीत वेतनवाढीबाबत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत थकीत वेतन समान टप्प्यांत देण्याचे आश्वासन देण्यात आले. फेब्रुवारीतील हप्ता रखडल्याने परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
निधी प्राप्त झाल्यानंतर सोमवारपर्यंत वाढीव वेतनाची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती महामंडळाने दिली आहे. दरम्यान, थकीत वेतनासाठी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या कामगार संघटनांनी आंदोलन स्थगित करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.