एसटीच्या ताफ्यात मार्च २०२६ पासून टप्प्याटप्प्याने ८,३०० नवीन बसेस; परिवहनमंत्री सरनाईकांची माहिती

Spread the love

एसटीच्या ताफ्यात मार्च २०२६ पासून टप्प्याटप्प्याने ८,३०० नवीन बसेस; परिवहनमंत्री सरनाईकांची माहिती

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्य महामार्ग परिवहन अर्थात एसटीच्या ताफ्यात लवकरच ८,३०० नवीन बसगाड्या दाखल होणार आहेत. करोनाकाळापूर्वी एसटीच्या ताफ्यात जवळपास १९ हजार बसेस होत्या, मात्र २०२४ वर्षाअखेरच बसची संख्या १२,६०० पर्यंत रोडावली. परंतु, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला.

सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात; मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. त्या अनुषंगाने बस गाड्यांची संख्या वाढल्यावर प्रवासी वाढून पर्यायाने उत्पन्न वाढेल, असा विश्वास परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळाचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये, तर उत्पन्न सुमारे ३३ कोटी रुपये आहे. म्हणजेच, महामंडळाची रोजची तूट एक ते दीड कोटीं रुपयांच्या घरात आहे. परंतु, ही तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी निर्णय घेतला आहे.

करोनापूर्वी एसटीकडे १८ ते १९ हजार बसेस होत्या. त्यातून दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र, करोनाकाळ आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या चार-पाच वर्षांत बसखरेदी रखडली. परिणामी, २०२४ अखेर बसेसची संख्या घटून सुमारे १२,६०० वर आली. परंतु, राज्य सरकारने महिलांना तिकिटात निम्मी सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढू लागला असून, सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. यातून अनेक मार्गांवर एसटीच्या फेऱ्या आता अपुऱ्या पडत आहेत.

एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांत २० ते २५ हजार बसेस खरेदी करण्याचा मानस आहे. त्यास राज्य सरकारची तत्त्वतः मान्यता मिळाली असून, यंदा पहिल्या टप्प्यात ८,३०० बसेस दाखल होणार आहेत. त्यामध्ये तीन हजार बस या ‘३ बाय २’ रचनेच्या ५५ आसनी बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने दाखल होतील. या बसना ‘राजमाता जिजाऊसाहेब’ यांचे नाव देण्यात आले असून दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर धावतील. तर, पाच हजार साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी १०० मिडी बसेस तसेच २०० अत्याधुनिक बसेसही विकत घेण्यात येणार आहेत. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी या सर्व बसेस ताफ्यात आल्यावर दररोज ७० ते ७५ लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा महामंडळाचा मानस आहे’, असे सरनाईक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon