मदतीचा बहाणा, प्रेमाचे नाटक आणि अमानुष अत्याचार; छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएसआयचा घृणास्पद कृत्यप्रकार
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांच्याच हातून कायद्याची आणि माणुसकीची पायमल्ली झाल्याचा संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आला आहे. मदतीचा बहाणा करून एका ५८ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने (पीएसआय) २३ वर्षीय तरुणीचा विश्वास संपादन करत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळची नांदेडची आणि सध्या पुण्यात खासगी कंपनीत कार्यरत असलेली ही तरुणी ७ मार्च २०२५ रोजी हरवलेल्या मोबाईलबाबत तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाणे येथे गेली होती. याच ठिकाणी तिची ओळख पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण यांच्याशी झाली. मदतीच्या नावाखाली त्यांनी तरुणीचा मोबाईल क्रमांक घेतला आणि ‘नंबर कन्फर्म’ करण्याच्या बहाण्याने संपर्क सुरू केला. पुढे हा संवाद वाढत गेला आणि प्रेमाचे नाटक करत अधिकाऱ्याने तिचा विश्वास संपादन केला.
लग्नाचे खोटे आमिष दाखवत आरोपीने बनावट मंगळसूत्र बांधून तरुणीला पत्नी असल्याचा भास निर्माण केला. या फसवणुकीच्या जोरावर शहरातील विविध लॉजमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या काळात तरुणी गर्भवती राहिल्यानंतर, तिच्या इच्छेविरुद्ध पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे तीन वेळा गर्भपात घडवून आणल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार मार्च २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे सांगण्यात आले आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने लग्नाचा आग्रह धरला असता, आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत तिला मारहाण केली. प्रकरण उघड झाल्यानंतर आरोपीची पत्नी नर्मदा चव्हाण आणि मुलगा सागर चव्हाण यांनीही पीडितेला धमकावल्याचा आरोप आहे. २८ जानेवारी रोजी पत्नीने ‘पाठलाग करू नको, गर्भपात कर’ अशी धमकी देत मारहाण केली, तर मुलानेही हात उचलल्याने तरुणीचा दीड महिन्याचा गर्भपात झाल्याचा गंभीर दावा तिने केला आहे.
सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाची नोंद क्रांती चौक पोलीस ठाणे आणि बेगमपुरा पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.