दरमहा २० हजार पोटगी टाळण्यासाठी नवऱ्याचा थरारक कट; पत्नीला संपवण्यासाठी दोन लाखांची सुपारी, घराला पेटवले
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव : न्यायालयाने पत्नीला दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिल्यानंतर तो टाळण्यासाठी पतीने थेट पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे महिलेच्या घरावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आल्याच्या सणसणाटी घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने काही दिवसांतच पर्दाफाश केला. या प्रकरणात पीडित महिलेचा पतीच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेत फिर्यादी किरण उमेश राऊळ आणि त्यांची आई नगरदेवळा येथील घरी झोपेत असताना दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधून घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावली होती. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
तपासादरम्यान उघड झाले की, न्यायालयाच्या आदेशामुळे दरमहा पोटगी द्यावी लागणार असल्याने रागातून पतीने पत्नीला ‘धडा’ शिकवण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी एक लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने हा गुन्हा किरण राऊळ यांचे पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली. दोघांमध्ये न्यायालयीन वाद सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर हा कट रचण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत मुख्य सूत्रधारासह एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून नऊ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेखर डोमाळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.