५ कोटींच्या खंडणीसाठी रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबाराचा कट; मुंबई पोलीस व यूपी एसटीएफकडून ७ आरोपी अटकेत

Spread the love

५ कोटींच्या खंडणीसाठी रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबाराचा कट; मुंबई पोलीस व यूपी एसटीएफकडून ७ आरोपी अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारा खंडणीचा मोठा कट उघडकीस आला आहे. ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शेट्टी यांच्या निवासस्थानावर गोळीबार घडवून आणण्याचा हा सुनियोजित डाव असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (यूपी एसटीएफ) यांच्या संयुक्त कारवाईत या प्रकरणातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा कट आंतरराज्यीय टोळीने रचला होता. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथून कार्यरत असलेल्या शुभम लोणकर गँगने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दबाव निर्माण करून खंडणी उकळणे हा या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश होता. या कटासाठी शुभम लोणकरने गोलू पंडित याला मोठी रक्कम पुरविल्याची माहितीही समोर आली आहे.

गोळीबारापूर्वी आरोपींनी शेट्टी यांच्या घराची सखोल टेहळणी (रेकी) केली होती. सनी आणि सोनू या दोघांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था, ये-जा मार्ग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची माहिती गोळा करून ती मुख्य शूटर दीपकला दिली. आग्रा येथील रहिवासी असलेल्या दीपकने सेमी-ऑटोमॅटिक पिस्तूलचा वापर करून प्रत्यक्ष गोळीबार केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

हल्ल्यानंतर आरोपींना पळून जाण्यास मदत करण्यात आली. यामध्ये सोनूचा भाऊ ऋतिक, तसेच जतिन भारद्वाज आणि विशाल यांची भूमिका महत्त्वाची होती. हे सर्व आरोपी काही काळ दिल्ली-एनसीआर व हरियाणा परिसरात लपून बसले होते. या संपूर्ण कटाचा दुवा म्हणून विष्णू कुशवाहा कार्यरत असल्याचे उघड झाले असून, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोन कॉल्सद्वारे समन्वय साधत होता.

अखेर, पोलिसांनी हरियाणातील झज्जर आणि गाझियाबाद परिसरात छापे टाकून दीपकसह सनी, सोनू, ऋतिक, विष्णू, जतिन आणि विशाल या सातही आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे बॉलिवूडला लक्ष्य करणाऱ्या खंडणीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या टोळीचे इतर साथीदार आणि आर्थिक साखळीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon