मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख ठरली महागात; लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार, १२ लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : जोडीदार शोधण्यासाठी मॅट्रिमोनिअल संकेतस्थळांचा वाढता वापर होत असतानाच त्यातून फसवणुकीचे गंभीर प्रकारही उघडकीस येत आहेत. नवी मुंबईतील कामोठे परिसरात ३२ वर्षीय घटस्फोटीत महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करत तब्बल १२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय रंगराव पाटील (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो पनवेल तालुक्यातील करंजाडे परिसरातील रहिवासी आहे. पीडित महिला कामोठे परिसरात राहते. दोघेही घटस्फोटीत असून, आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याच्या उद्देशाने त्यांनी एका प्रसिद्ध मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्याच माध्यमातून त्यांची ओळख झाली.
ऑनलाईन संवादानंतर आरोपीने गोड बोलून आणि लग्नाचे आश्वासन देत महिलेचा विश्वास संपादन केला. पुढे प्रत्यक्ष भेटी वाढवत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. याच दरम्यान, विविध कारणे पुढे करत आरोपीने महिलेकडून मोठ्या रकमेची मागणी सुरू केली. विश्वासाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेकडून त्याने एकूण १२ लाख रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे.
काही काळानंतर आरोपीने प्रत्यक्ष लग्नास टाळाटाळ सुरू केल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मानसिक धक्क्यातून सावरत तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत कामोठे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे ऑनलाईन माध्यमातून जोडीदार शोधताना आवश्यक ती पडताळणी व सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा तीव्र जाणीव झाली आहे.