बुधवार पेठेतील पोलिस कारवाईवर वाद; मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप, आयोगाकडे तक्रार
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : शहरातील बुधवार पेठ येथे बेकायदा वास्तव्याच्या माहितीवरून पुणे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईची मोठी चर्चा सुरू असतानाच, या कारवाईमुळे पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारवाईदरम्यान ग्राहकांना सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बसवून अपमानित केल्याचा आरोप करत एका व्यक्तीने थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार राबवलेल्या या कारवाईत गुन्हे शाखा व विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी बुधवार पेठेतील कुंटणखान्यांची झडती घेतली. या मोहिमेत दोन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली असून काही अल्पवयीन मुलींनाही वाचवण्यात आले. सुमारे ४१ इमारती तपासून ७०० हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली.
मात्र, या कारवाईदरम्यान कोणताही गुन्हा दाखल नसताना अनेक ग्राहकांना तासन्तास रस्त्यावर बसवण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. सार्वजनिकरीत्या ओळख उघड होईल, अशा प्रकारे वागणूक देणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला असून, आयोगाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.