दोन पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी; दोघेही गंभीर जखमी, जळगाव पोलिस दलात खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
जळगाव : शिस्त आणि कायद्याचे रक्षकच आपसात भिडल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ड्युटी वाटपावरून दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झालेला वाद शनिवारी रात्री तुंबळ हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेत दोघेही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून कार्यरत असलेले शशिकांत पारधी आणि राकेश पाटील यांच्यात काही महिन्यांपासून धुसफूस सुरू होती. शनिवारी रात्री ड्युटी लावण्यावरून पुन्हा वाद झाला आणि क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली. हाणामारीदरम्यान शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्यावर चोपडा येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेल्या या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनेला दुजोरा देताना सांगितले की, दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये पूर्वीपासून हेवे-दावे होते. ड्युटी वाटपावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. प्रकरणाची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून, दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे पोलिसांच्या शिस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अंतर्गत वाद व्यवस्थापनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.