कल्याणमध्ये अंमली पदार्थ रॅकेटवर मोठा घाव; नायजेरियनसह तिघे अटकेत, २.१५ कोटींचा मुद्देमाल जप्त

Spread the love

कल्याणमध्ये अंमली पदार्थ रॅकेटवर मोठा घाव; नायजेरियनसह तिघे अटकेत, २.१५ कोटींचा मुद्देमाल जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : महाराष्ट्र शासन (गृह विभाग) अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयच्या पोलीस उप आयुक्त, परिमंडळ–३, कल्याण यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष कारवाई करत नायजेरियन नागरिकासह तीन अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २ कोटी १५ लाख ८० हजार रुपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) व कोकेन जप्त करण्यात आला.

१३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गस्तीदरम्यान डोंबिवली पूर्वेतील गणेशनगर–उंबर्ली गाव परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. सार्वजनिक रस्त्याच्या कडेला तीन इसम हातवारे करत चर्चा करताना दिसले. त्यापैकी एक इसम परदेशी नागरिकासारखा दिसत असून त्याच्या पाठीवर काळी बॅग होती. तो पिवळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा दुचाकीवर होता; दुचाकीच्या पुढील व मागील नंबर प्लेट वाकवलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी चौकशीसाठी पुढे जाताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्काळ कारवाई करत १८.२० वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले. अटकेत आलेल्यांमध्ये एक नायजेरियन नागरिक, अविनाश व्यंकटेश सदरला (३४), अंबरनाथ पश्चिम,
गजेंद्रन संजीव नायडु (३४), अंबरनाथ पश्चिम
यांचा समावेश आहे.

पंचनामा करून घेतलेल्या अंगझडतीत १ किलो ४ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) (किंमत अंदाजे २ कोटी ८० हजार रुपये), १५ ग्रॅम कोकेन (किंमत १५ लाख रुपये), रोख २१,५०० रुपये, ६० हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा दुचाकी आणि काळी बॅग असा एकूण २ कोटी १६ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क), २९ अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक १७३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, परिमंडळ–३, कल्याण हद्दीत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत अंमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणी १०१ गुन्हे दाखल, १४६ आरोपी अटकेत असून ६ कोटी ३६ लाख १४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात गांजा, एम.डी., चरस, प्रतिबंधित गोळ्या व कोडीनयुक्त सिरपचा समावेश आहे.

ही कारवाई आशुतोष डुंबरे, ज्ञानेश्वर चव्हाण, संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon