सोलापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई; तीन वर्षांपासून फरार मुख्य सूत्रधार जेरबंद

Spread the love

सोलापूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई; तीन वर्षांपासून फरार मुख्य सूत्रधार जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

सोलापूर : आंतरराष्ट्रीय ऑनलाइन फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत सोलापूर शहर सायबर पोलिसांनी तीन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक केली. ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्वेरा याला लुकआउट नोटीसच्या आधारे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ताब्यात घेण्यात आले.

तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या काही वर्षांपासून लाओस येथे वास्तव्यास होता. तेथून चिनी व मलेशियन साथीदारांच्या मदतीने भारतातील नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जात होते. शेअर बाजारात १० ते ३०० टक्के नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ६२ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

फसवणुकीतून मिळालेली रक्कम डिजिटल करन्सी (USDT) वॉलेटच्या माध्यमातून परदेशात ट्रान्सफर करण्यात आल्याचेही समोर आले आहे. यासाठी AL HAREEM HAJIJ UMRAH SERVICES आणि BLACKSEED SOLUTIONS या खात्यांचा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी परदेशात उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून युवकांना लाओसमध्ये बोलावत असे. तेथे त्यांचे पासपोर्ट जप्त करून त्यांच्याकडूनच ऑनलाइन फसवणूक करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे.

या प्रकरणी देशभरातील विविध राज्यांत ९२ ऑनलाइन तक्रारी नोंदविण्यात आल्या असून आतापर्यंत आठ आरोपी निष्पन्न झाले आहेत. उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सोलापूर शहर सायबर पोलिसांकडून तपासाला वेग देण्यात आला आहे. या कारवाईमुळे ऑनलाइन गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon