अहिल्यानगरमध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबारात ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू; घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु

Spread the love

अहिल्यानगरमध्ये पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबारात ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू; घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु

योगेश पांडे / वार्ताहर

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घोडेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या भीषण टोळी युद्धाने परिसर हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून पेटलेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले आणि यात नितीन विलास शिरसाठ (३३) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या गटातील सुरज फुलमाळी (२३) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर गावठी कट्ट्यांमधून गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात नितीन शिरसाठ याचा मृत्यू झाला, तर सुरज फुलमाळी गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. आता या गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

जखमी आणि मयत दोघांनाही तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालय परिसरातही दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाले रुग्णालयातच हाणामारी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमागे पूर्वीपासून सुरू असलेले वैमनस्य कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत झालेली ही दुसरी गोळीबाराची घटना असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गावठी कट्टे आणि पिस्तुलांचा सर्रास वापर चिंतेचा विषय ठरत आहे. हे बेकायदेशीर शस्त्र गावात येतात कुठून? त्यावर कारवाई का होत नाही? बेकायदेशिर शस्त्रांचा पुरवठा कोण करतं?, असे सवाल आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon