व्हॉट्सॲप गुंतवणूक घोटाळा उघड; विमा एजंटची १.८९ कोटींची सायबर फसवणूक

Spread the love

व्हॉट्सॲप गुंतवणूक घोटाळा उघड; विमा एजंटची १.८९ कोटींची सायबर फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत अंधेरीतील एका ६२ वर्षीय विमा एजंटची १ कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पश्चिम सायबर सेल पोलिसांनी चैतन्य पडाळकर आणि दस्तगीर कासी या दोन आरोपींना अटक केली आहे. वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

तक्रारदार गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये एका खासगी कंपनीच्या नावाने चालविण्यात येणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले गेले होते. या ग्रुपमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत माहिती देण्यात येत होती. काही सदस्यांनी केलेल्या गुंतवणुकीत नफा झाल्याचे दाखवण्यात आल्याने तक्रारदारांचा विश्वास बसला. त्यानंतर ग्रुप ॲडमिनच्या सांगण्यावरून त्यांनीही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत तक्रारदारांनी विविध शेअरमध्ये एकूण १ कोटी ८९ लाख ५३ हजार रुपयांची गुंतवणूक केली. ऑनलाईन खात्यात मोठा नफा दिसत असल्याने त्यांनी दोन लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार प्रयत्न करूनही पैसे मिळाले नाहीत. याबाबत विचारणा केली असता ॲडमिनने त्यांचा ‘क्रेडिट स्कोअर’ कमी असल्याचे कारण सांगत आणखी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.

तक्रारदारांनी पुढील गुंतवणुकीस नकार दिल्यानंतर संबंधित ॲडमिनने त्यांना ग्रुपमधून काढून टाकत संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी पश्चिम सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. तपासादरम्यान चैतन्य पडाळकर आणि दस्तगीर कासी हे मुख्य सायबर ठगांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. पोलिसांकडून या प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon