नोकरी करत रिक्षा चालवून अतिरिक्त उत्पन्न घेणाऱ्यांना लावणार चाप; थेट परवाना रद्द होणार

Spread the love

नोकरी करत रिक्षा चालवून अतिरिक्त उत्पन्न घेणाऱ्यांना लावणार चाप; थेट परवाना रद्द होणार

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई शहरात ऑटो रिक्षा परवाना देताना अर्जदार कोणत्याही प्रकारच्या नोकरीत नसावा, अशी मोटार वाहन कायद्यानुसार स्पष्ट अट आहे. परवाना घेताना संबंधित व्यक्तीकडून तसे प्रतिज्ञापत्रही घेतले जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक जण नोकरी करत असतानाही रिक्षा परवाना घेत असल्याचे किंवा परवाना घेऊन रिक्षा इतरांना भाड्याने देत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. परिणामी पूर्णपणे रिक्षा व्यवसायावर अवलंबून असलेल्या चालकांचे नुकसान होत आहे. या गैरप्रकारांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या (‘एमएमआरटीए’) अखत्यारित मुंबईत ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली, अशी एकूण १० आरटीओ कार्यालये आहेत. या आरटीओमध्ये ४ लाख १७ हजार रिक्षाची नोंद आहे. मर्यादित परवान्यांमुळे नव्या अर्जदारांना संधी कमी मिळत असल्याची तक्रार आहे. नियमांनुसार नोकरी करणाऱ्यास रिक्षा परवाना देण्यास मनाई आहे. रिक्षा व्यवसाय हा बेरोजगारांसाठी रोजगाराचे साधन म्हणून राखीव ठेवला आहे. परवाना अर्ज करताना अर्जदाराकडून नोकरीत नसल्याचे व स्वतः रिक्षा चालविण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते.

आरटीओचे नियम धाब्यावर बसवत काही जण परवाना घेतल्यानंतर रिक्षा तृतीय व्यक्तींना भाड्याने देतात आणि स्वतः नोकरी करतात. यामुळे नियमांचे उल्लंघन होते. अशा प्रकारांमुळे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या गरजू चालकांना परवाना मिळत नाही, अशी नाराजी संघटनांकडून व्यक्त केली जाते.

नियमभंग आढळल्यास परवाना रद्द करणे, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. नोकरी लागल्यानंतर परवाना परत करणे बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात किती जणांनी परत केले, याची स्पष्ट आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. रिक्षा चालक संघटनांनी तपासणी मोहीम राबवून गैरप्रकारांवर कारवाई करावी व गरजूंना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon