वृद्धांना भुरळ घालून दागिने लंपास करणारी टोळी जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
उल्हासनगर : वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचा विश्वास संपादन करत हातचलाखीने अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत टोळीला गुन्हे शाखा घटक–४, उल्हासनगर यांनी अटक केली आहे. या टोळीमुळे शहरासह परिसरात वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस तपासात या टोळीने रस्त्यावर, बाजारपेठेत तसेच मंदिर परिसरात वृद्धांना अडवून चौकशीच्या बहाण्याने संवाद साधत त्यांचे लक्ष विचलित करून दागिने काढून घेण्याच्या अनेक घटना केल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याने गुन्हे शाखा घटक–४ ने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.
अटकेनंतर आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीच्या अटकेमुळे आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः वृद्ध व्यक्तींना, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना अधिक सतर्क राहण्याचे आणि कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.