प्रॉपर्टी टैक्स न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांवर पालिकेची मोठी कारवाई; थेट मालमत्तेचा लिलाव करणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधात मुंबई महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. दिलेल्या कालावधीमध्ये कर भरण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा-या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महानगरपालिकेकडून जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत कर भरणा न केलेल्यांना मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदर मालमत्तेवर कलम २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील जंगल मालमत्ता जप्त करुन लिलाव केला जाईल. जप्त चीज वस्तुतूनही कर वसूल झाला नाही तर, कलम २०६ अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ता कर बिल मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते. नागरिकांची कर भरणा करण्याकरीता होणारी गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईल सुविधा उपलब्ध आहे. याबाबतची माहिती
महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कर भरणा ऑनलाईन करण्याकरीता करदात्यांनी महानगरपालिका संकेतस्थळावरील माहितीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप कर भरणा करण्यात येत नसल्याने आाणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जप्तीची नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दंड रकमेसह थकबाकी रकमेचा यात समावेश आहे. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.