दुर्गाडी किल्ल्यावरून ‘डिप क्लिनिंग’ विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

Spread the love

दुर्गाडी किल्ल्यावरून ‘डिप क्लिनिंग’ विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी ‘डिप क्लिनिंग’ विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ सोमवारी (दि. ९) दुर्गाडी किल्ला येथून करण्यात आला. महापौर सौ. हर्षाली चौधरी (थविल) व उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते दुर्गा देवीचे दर्शन घेऊन या मोहिमेला प्रारंभ झाला.

ही विशेष स्वच्छता मोहीम ९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महानगरपालिकेच्या सर्व प्रभागक्षेत्रात दैनंदिन स्वरूपात राबविण्यात येणार आहे. उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) रामदास कोकरे यांनी मोहिमेची प्रस्तावना करताना स्वच्छतेचे महत्त्व विशद केले व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता असल्याचे नमूद केले.

आयुक्त अभिनव गोयल यांनी शहराची सर्वांगीण स्वच्छता राखून शाश्वत स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच शहराचे स्वच्छता मानांकन उंचावण्यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. उपमहापौर राहुल दामले यांनी स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून शहर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला.

महापौर सौ. हर्षाली चौधरी (थविल) यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपूर्ण शहरासह ग्रामीण भागातही सर्वकष विशेष स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवून शहराचे मानांकन वाढविण्याचे निर्देश दिले. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी महापौर, उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांच्यासह सन्माननीय नगरसेवक, सहाय्यक आयुक्त, मुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon