मालाडमध्ये शाळेत चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; शिपायासह प्रकरण दडपणाऱ्या सीईओला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : बदलापूर येथील शाळेतील घटनेची धग अद्याप शमलेली नसतानाच, मुंबईतील मालाड परिसरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेतील शिपायाने धमकावून अत्याचार केल्याचा आरोप असून, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यालाही (सीईओ) अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १२ जानेवारी रोजी ही घटना घडली. शाळेत कार्यरत असलेल्या शिपायाने बालिकेला धमकावून तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर काही दिवस मुलगी भयभीत अवस्थेत होती. अलीकडेच तिने पालकांकडे हा प्रकार सांगितल्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या तपासात शाळेच्या प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरली. पालकांनी जाब विचारल्यानंतर शाळेचे ६५ वर्षीय सीईओ अनंत यज्ञीक यांनी शाळेची बदनामी होईल, असे सांगत पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिपाई अनिल पांचाळ (वय ३०) आणि सीईओ अनंत यज्ञीक या दोघांनाही अटक केली. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ७४, ३५१ (२) तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत कलम १०, १७ आणि २१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात येत असून, शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचाऱ्यांच्या नोंदी आणि व्यवस्थापनाची भूमिका यांचा सखोल तपास सुरू आहे.
शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शाळेच्या प्रशासनाची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.