दिल्ली–मुंबई ‘हिंदायान सायक्लोथॉन’ला ठाण्यातून मुंबईकडे मार्गस्थ; महापौरांकडून हिरवा झेंडा
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय तसेच संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने दिल्लीहून ३० नोव्हेंबर रोजी सुरू झालेली ‘हिंदायान सायक्लोथॉन’ ठाण्यातून मुंबईकडे रवाना झाली. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते सायकलस्वारांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या सायक्लोथॉनमध्ये तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली. महापौर व उपमहापौरांनी सायकलस्वारांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांबाबत जाणून घेतले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
सायकलिंगला शाश्वत, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम म्हणून प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे महापौर पिंपळोलकर यांनी सांगितले. दिल्लीपासून सुरू झालेला हा प्रवास ठाण्यातून मुंबईपर्यंत पोहोचणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत सायक्लोथॉनचे महत्त्व अधोरेखित करत उपमहापौर पाटील यांनी सायकलिंगमुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता वाढते, असे सांगितले.
ठाणे महानगरपालिकेतून सुरू झालेल्या सायक्लोथॉनचा समारोप कुलाबा मिलिटरी स्टेशन, मुंबई येथे झाला. यावेळी मेजर सागर सावंत यांच्या हस्ते सहभागी सायकलप्रेमींना पदक देऊन गौरविण्यात आले. आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत भविष्यात अधिकाधिक सहभाग वाढविण्याचे आवाहन हिंदायान फाऊंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी केले.
या प्रसंगी हिंदायान फाऊंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके, ‘आम्ही सायकल प्रेमी’ फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सदस्य अमोल कुळकर्णी, ठाणे महानगरपालिकेच्या प्र. उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसेच दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहाचे कर्मचारी उपस्थित होते.