गेल्या पाच दिवसापासून पाणी आले नाही म्हणून जेष्ठ नागरिक अर्ध नग्न अवस्थेत पोहचला उल्हासनगर महापालिकेत

Spread the love

गेल्या पाच दिवसापासून पाणी आले नाही म्हणून जेष्ठ नागरिक अर्ध नग्न अवस्थेत पोहचला उल्हासनगर महापालिकेत

योगेश पांडे / वार्ताहर

उल्हासनगर – काही समस्या अशा असतात ज्यामुळे सर्व सामान्य माणसांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून ही त्यावर काही तोडगा काढला जात नाही. शेवटी नागरिकांनाच असं काही करावं लागतं जेणे करून प्रशासनाला जाग येईल.अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. सध्या उल्हासनगरमध्ये एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक जेष्ठ नागरिक अर्ध नग्न अवस्थेत उल्हासनगर महापालिकेत पोहचला आहे. त्याची समस्या ऐकून तु्म्ही ही हैराण व्हाल. शिवाय महापालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबतही तुम्ही टीकेची झोड उठवल्या शिवाय राहाणार नाही.

व्हायरल व्हिडीओत दिसत असलेले राजाराम पवार आहेत. ते ६७ वर्षाचे आहे. ते उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ४ मध्ये राहातात. ते राहात असलेल्या भागात गेल्या पाच दिवसापासून पाणीच आले नाही. पाण्या शिवाय इथल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पवार यांनी यासंबंधी पाणीपुरठा विभागाशी वारंवार संपर्क केला. संबंधीत अधिकाऱ्याला एकदा नाही तर पन्नास वेळा फोन केला. पण काहीच प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी एक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी अर्धनग्न होत महापालिका कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली दुचाकी काढली आणि ते थेट महापालिकेच्या पाणी पुरवठा कार्यालयात पोहोचले. तिथे एक अधिकारी बसले होते. पवार ज्या अवस्थेत आले होते ते पाहून अधिकारी ही गडबडले. त्यांनी त्यांना बसण्यास सांगितले. काय झाले अशी विचारणा ही केली. त्यावर आमच्या इथं गेल्या पाच दिवसापासून पाणीच आले नाही असं सांगितले. याबाबत त्या अधिकाऱ्यांनी संबंधी व्यक्तीला फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण समोरच्या व्यक्तीने नेहमी प्रमाणे फोन उचललाच नाही.

पवार यांनी हीच बाब त्यांना सांगितले. आम्हीही संपर्क करतोय पण कोणताच प्रतिसाद दिला जात नाही. मग दुसऱ्या अधिकाऱ्याला फोन लावण्यात आला. त्याचा ही फोन सतत बिझी येत होता. पाच पाच दिवस पाणीच येत नसेल तर जगायचं कसं असा प्रश्न पवार यांनी यावेळी उपस्थित केला. आपण जेष्ठ नागरिक आहे. आपल्यावर आता ही वेळ आली आहे. प्रशासन आता तरी जागं होणार आहे का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्याला केला. राजाराम यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय उल्हासनगरमधील पाणी टंचाईचा विषय पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नवनिर्वाचीत महापौरांसमोर हा प्रश्न सोडवण्याचे आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon