वाढदिवसानिमित्त फुगे नेताना लिफ्टमध्ये स्फोट; तिघे किरकोळ जखमी

Spread the love

वाढदिवसानिमित्त फुगे नेताना लिफ्टमध्ये स्फोट; तिघे किरकोळ जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील पेट्रोल पंपासमोरील अनमोल टॉवर इमारतीत वाढदिवसानिमित्त नेण्यात येत असलेल्या हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांमुळे लिफ्टमध्ये अचानक स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटात लिफ्टमध्ये असलेला एक तरुण आणि दोन लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीतील एका फ्लॅटमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी हायड्रोजन गॅसने भरलेले फुगे आणण्यात आले होते. हे फुगे लिफ्टमधून वरच्या मजल्यावर नेत असताना अचानक मोठा स्फोट झाला. हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने बंदिस्त जागेत त्याचा वापर धोकादायक ठरतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

स्फोटानंतर लिफ्टमध्ये असलेले तिघेही तातडीने बाहेर पडले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. ही संपूर्ण घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातील दृश्ये सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

या प्रकरणी हायड्रोजन गॅसचे फुगे पुरविणाऱ्या विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी तसेच गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा धोकादायक प्रकारांबाबत सतर्क राहावे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon