टेंभुर्णीत पोलिसांवर थेट हल्ला; आरोपींनी एपीआयला ढकलले, उपनिरीक्षकाला जमिनीवर आदळले
पोलीस महानगर नेटवर्क
टेंभुर्णी : गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या टेंभुर्णी पोलिसांच्या पथकावरच आरोपींनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना माढा तालुक्यातील चौभे–पिंपरी येथे घडली. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील एपीआय गणेश चौधरी आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने हे पोलीस कर्मचाऱ्यांसह गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी चौभे–पिंपरी येथे गेले होते. त्यावेळी तीन सख्ख्या भावांनी संगनमत करून पोलिसांशी वाद घालत झटापट केली. आरोपी अक्षय भगवान जाधव याने पोलीस उपनिरीक्षक मदने यांच्या शर्टाला धरून त्यांना उचलत जमिनीवर आदळल्याचा आरोप आहे. तर आरोपी अमर भगवान जाधव याने एपीआय चौधरी यांच्या गळ्याला धरून त्यांना ढकलून दिले.
या झटापटीत उपनिरीक्षक मदने यांच्या शर्टाची बटणे तुटली असून त्यांना मुका मार लागला आहे. आरोपींनी पोलिसांना धमकावत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी अमर जाधव याने घटनास्थळी असलेली लहान मुलांची सायकल उचलून पोलिसांवर फेकण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे. अटक प्रक्रियेला तीव्र विरोध करत पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ही घटना ३ फेब्रुवारी रोजी पहाटे २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अक्षय भगवान जाधव, अमर भगवान जाधव आणि सागर भगवान जाधव (रा. जाधव वस्ती, चौभे–पिंपरी, ता. माढा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपींविरोधात यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय दंड संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हे नोंद आहेत. या घटनेप्रकरणी एपीआय गणेश बाबाजी चौधरी (वय ४१) यांनी फिर्याद दिली असून पोहेकॉ एन. जे. काशिद यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित डी. पवार अधिक तपास करत आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या एका महिन्यात पोलिसांवर हल्ला होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २ जानेवारी रोजी आलेगाव बु. येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे ‘पोलिसांचा धाक उरला आहे का?’ असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.