अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन कार्यात अडथळा; थेट गुन्हा दाखल होणार
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : अनधिकृतरीत्या रस्त्यांवर उभी करण्यात येणारी वाहने मुंबई अग्निशमन दलाच्या बचाव कार्यात मोठा अडथळा ठरत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे यापुढे आगीच्या किंवा आपत्तीच्या ठिकाणी अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या शीघ्र प्रतिसादात अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनमालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मुंबई अग्निशमन दल हे शहरातील नागरिकांसह प्राणी, पक्षी यांचे प्राण वाचविणे, तसेच आग व अन्य नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्तींपासून संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य बजावत आहे. या कामासाठी सुसज्ज वाहने, आधुनिक साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळासह अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने पोहोचत असते.
मात्र, मुंबईतील अनेक भागांत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वाहने अनधिकृतपणे उभी केली जात असल्याने अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचताना अडथळे निर्माण होतात. परिणामी बचाव व विमोचन कार्यात विलंब होऊन जीवित व वित्तहानी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीची दखल घेत आयुक्त गगराणी यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
नव्या कार्यपद्धतीनुसार, आगीच्या किंवा आपत्तीच्या ठिकाणी जीवितहानी, वित्तहानी किंवा जखमींचे प्रमाण लक्षणीय असेल आणि अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन कार्यात विलंब झाल्याचे आढळून आल्यास, संबंधित अग्निशमन वाहनावरील अधिकारी किंवा कर्मचारी बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांचे नोंदणी क्रमांकासह छायाचित्रे काढतील. वरिष्ठांच्या परवानगीने ही माहिती संबंधित पोलिस ठाण्यात सादर करून वाहनमालकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे अनधिकृत पार्किंगविरोधात नागरिकांकडूनही तक्रारी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र कार्यप्रणाली निश्चित केली असून, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस विभाग किंवा संबंधित विभाग कार्यालयाकडे वर्ग करण्यात येतील आणि तक्रारदारास त्याची माहिती देण्यात येईल, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी दिली.