ठाण्यातील सरकारी वकील लाचप्रकरणी दोषी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला यश

Spread the love

ठाण्यातील सरकारी वकील लाचप्रकरणी दोषी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला यश

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : न्यायालयीन कामकाजात अनुकूल युक्तिवाद करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी ठाण्यातील सरकारी वकील संध्या दिनकर बच्छाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात मा. जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे (कोर्ट क्र. १) यांनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने आरोपीस लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये सहा महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच कलम १३(१)(ड) सह १३(२) अंतर्गत सहा महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्रकरणाचा तपशील असा की, आरोपी संध्या बच्छाव यांनी लोकसेविका या नात्याने मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करत, वाशी पोलीस ठाणे (नवी मुंबई) येथे दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत न्यायालयात अनुकूल युक्तिवाद करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर संबंधित गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या खटल्यात सरकारी वकील संजय मोरे, केस निरीक्षक विजय कावळे (पोलीस निरीक्षक), तसेच अनिता पाटील आणि सतीश ठाकरे यांनी तपास व न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची मदत केली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र यांच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास किंवा कोणत्याही लोकसेवकाकडून लाच मागितली जात असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon