शीव स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून तिघे रुळांवर; गर्दीचा रेटा की वाद? रेल्वे पोलिसांचा तपास सुरू
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील शीव (सायन) स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी गर्दीच्या वेळी धावत्या लोकलमधून तीन प्रवासी थेट रेल्वे रुळांवर पडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात तिघेही प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.
शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी एक धीमी लोकल शीव स्थानकावरून सुटल्यानंतर काही अंतरावर ही घटना घडली. सकाळची गर्दी असल्याने डब्यात प्रवाशांची प्रचंड कोंडी होती. गाडीने वेग घेताच तीन प्रवाशांचा तोल गेला आणि ते धावत्या लोकलमधून खाली पडले, अशी प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच मोटरमन व रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा सुमारे आठ ते नऊ मिनिटे बंद केला. यामुळे दुसऱ्या दिशेने येणाऱ्या गाड्यांमुळे जखमींना धोका होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली. रेल्वे कर्मचारी व पोलिसांनी रुळांवर पडलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात अफझल चौधरी (३६, गोवंडी), सचिन विश्वकर्मा (२१, नालासोपारा/ठाणे) आणि जैनिल सय्यद (२५, कुर्ला) हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, अफझल चौधरी यांच्या पोटाला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर उर्वरित दोघांना हात व कंबरेला दुखापत आणि फ्रॅक्चर झाले आहे.
दरम्यान, अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही प्रत्यक्षदर्शींनी प्रचंड गर्दीच्या रेट्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले, तर काही वृत्तांनुसार डब्यातील प्रवाशांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दादर रेल्वे पोलीस (जीआरपी) या दोन्ही शक्यतांचा तपास करत असून पुढील चौकशी सुरू आहे.