सोलापूर ग्रामीणमध्ये सराईत गुन्हेगारावर MPDAची कारवाई; अवधुत शेंडगे येरवडा कारागृहात स्थानबद्ध
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर : सोलापूर ग्रामीण हद्दीतील वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधुत नारायण शेंडगे याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (MPDA) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली असून, त्यास पुणे येथील येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वेळापूर व परिसरातील नागरिकांमध्ये दिलास्याची भावना निर्माण झाली आहे.
पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण भागातील शरिराविषयक गुन्हे, वाळुतस्करी आणि अवैध धंद्यांमध्ये सक्रिय असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अवधुत शेंडगे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास करून MPDA अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला.
शेंडगे याच्याविरुद्ध वेळापूर व अकलुज पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध सावकारी, घातक हत्यारांचा वापर तसेच विनापरवाना हत्यार बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असतानाही त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर वेळापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांमार्फत जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंजुरी देत MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश काढले.
या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच वेळापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, सोलापूर ग्रामीण हद्दीतील वाळुतस्करी, शरिराविषयक व मालाविषयक गुन्हे तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींचे स्वतंत्र गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असून, भविष्यातही MPDA अंतर्गत अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.