मेडिकलच्या आडून ‘ड्रग्ज’चा धंदा!
लातूरच्या गंजगोलाईत छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांचा छापा; १६ लाखांचा माल जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – शहरात अमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम राबवत असताना गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी लातूर येथून १६ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या कोडीनयुक्त कफ सिरपच्या ४,०८० बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी लातूरच्या एका मेडिकल स्टोअर मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना, या तस्करीचा मुख्य दुवा लातूरमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. ‘मराठवाडा मेडिकल’चा मालक सय्यद शाहीद अली (३०) हा या अमली सिरपचा मुख्य पुरवठादार असल्याची गोपनीय माहिती मिळताच, गुन्हे शाखेचे पथक लातूरला रवाना झाले. पोलिसांनी गंजगोलाई परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्या माहितीवरून एका ट्रान्सपोर्ट गोदामातून ३४ बॉक्स जप्त केले.
तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, हा साठा संभाजीनगरमधील रेकॉर्डवरील फरार आरोपी अशपाक पटेल याला दिला जाणार होता. अशपाक पटेल हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.