कराडच्या पाचपुतेवाडीत पुणे डीआरआय कडून छापेमारी; ६ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, साताऱ्यात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
सातारा – साताऱ्यातील कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या डीआरआय विभागानं मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आल्यानं ड्रग्जवर कारवाई झाल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात महिन्यात दुसरी कारवाई झाली आहे. डिसेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करत ड्रग्ज जप्त केलं होतं. डीआरआय विभागानं केलेल्या कारवाईबाबत सातारा पोलीसही अनभिज्ञ असल्याची माहिती आहे.
कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या डीआरआय म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे.कराड ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या ठिकाणाहून किमान ६ हजार कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
पाचपुतेवाडीत छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये तीन आयपीएस अधिकारी होते. महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला बाबा मोरे याचा हा कारखाना असल्याची माहिती असून त्याला ताब्यात घेतले आहे. डीआरआय विभागाच्या पथकाने एक शेड सील केले असून या शेडमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केलं जात असल्याची उलटसुलट चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे. या कारवाई बाबत सातारा, कराड पोलिसही अनभिज्ञ आहेत.त्यामुळे नक्की या ठिकाणी कोणतं अंमली पदार्थ तयार केला जात होतं आणि आणखी किती जणांना ताब्यात घेण्यात आले, याची माहिती समोर येऊ शकली नाही.