भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि शिंदे शिवसेना एकत्र; तयार केली मीरा-भाईंदर विकास आघाडी

Spread the love

भाजपच्या विरोधात काँग्रेस आणि शिंदे शिवसेना एकत्र; तयार केली मीरा-भाईंदर विकास आघाडी

योगेश पांडे / वार्ताहर

मिरा भायंदर – मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागून एक आठवडा उलटल्यानंतर आता शहरात नव्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपला ताकदीने विरोध करता यावा यासाठी आता काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र आली आहे. या दोन्ही पक्षांनी मिळून ‘मीरा-भाईंदर विकास आघाडी’ स्थापन केली असून, कोकण विभागीय आयुक्तांकडे याची अधिकृत नोंदणीही करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या एकूण ९५ जागांपैकी भाजपला ७८ जागांसह निर्भेळ यश मिळाले आहे. दुसरीकडे, काँग्रेसला १३ आणि शिंदे सेनेला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत, मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत एक अपक्ष उमेदवार निवडून आला असून तो देखील भाजपसोबत गेल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने, महापौरपद, उपमहापौरपदासह विविध समित्यांची अध्यक्षपदे ही भाजपकडेच राहणार आहेत. महापालिकेच्या सभागृहात भाजपसमोर कणखरपणे विरोध करता यावा यासाठी एकत्र यावे ही गरज काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाटू लागली होती. त्यातूनच ही आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक पातळीवरचा निर्णय या युतीबाबत बोलताना दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. ही कोणतीही राजकीय युती नसून केवळ स्थानिक नगरसेवकांनी घेतलेला निर्णय असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसेन यांनी स्पष्ट केले की, ही केवळ महापालिकेतील कामकाजासाठी केलेली व्यवस्था आहे. शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनीही हा निर्णय स्थानिक पातळीवरचा असल्याचे म्हटले आहे. या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे जय ठाकूर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon