लोखंडवाला गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान याला अटक
योगेश पांडे – वार्ताहर
मुंबई – मुंबई – अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल आर. खान ऊर्फ केआरके याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. परवाना असलेली बंदूक साफ करताना गोळी सुटल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. त्याला न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
१८ जानेवारीला लोखंडवाला येथील नालंदा इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील रहिवाशांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. रहिवासी बाहेर आले असता त्यांना इमारतीच्या आवारात दोन गोळ्या आढळल्या. तसेच भिंतीवर गोळ्या लागल्याचे निशाणही दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान खान याला ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथकही करीत आहे. जप्त केलेल्या गोळ्या रासायनिक विश्लेषणासाठी कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (एफएसएल) पाठविल्या आहेत.