सोलार सिस्टीम मंजुरीसाठी ३ हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर : घरगुती सोलार सिस्टीमच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई जुळे सोलापूर परिसरात करण्यात आली असून आरोपीविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित विलासराव रेडेकर (वय ४२) असे असून ते महावितरणच्या जुळे सोलापूर शाखा कार्यालयात सहायक अभियंता (वर्ग-२) म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते गॅलेक्सी अपार्टमेंट, सिंधु विहार, जुळे सोलापूर येथे वास्तव्यास असून त्यांचे मूळ गाव उचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर आहे.
तक्रारदार हे ग्राहकांच्या मागणीनुसार घरांवर सोलार सिस्टीम बसविण्याचे काम करतात. जुळे सोलापूर येथील एका ग्राहकाच्या घरावर ३.५ किलोवॅट क्षमतेची सोलार सिस्टीम बसविण्यासाठी त्यांनी महावितरणकडे ऑनलाईन अर्ज सादर केला होता. हा अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी आरोपी रेडेकर यांच्याकडे होती. मात्र, मंजुरीसाठी प्रति किलोवॅट एक हजार रुपये याप्रमाणे तीन किलोवॅटसाठी एकूण तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला.
याप्रकरणी तक्रारदाराने २३ जानेवारी २०२६ रोजी एसीबी, सोलापूर कार्यालयात तक्रार दाखल केली. त्याच दिवशी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २४ जानेवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. सापळ्यादरम्यान आरोपीने तक्रारदाराकडून तीन हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ (सुधारित) मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.