दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने ४० हजार गुंतवणूकदारांची फसवणूक; समर्थ क्रॉप केअरच्या मालकाविरोधात गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : दामदुप्पट अथवा प्रतिमाह दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने हजारो नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर (पुणे) येथील समर्थ क्रॉप केअर कंपनीचे मालक प्रशांत अनिल गवळी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ हून अधिक जिल्ह्यांमधील सुमारे ४० हजारांहून अधिक गुंतवणूकदारांकडून अंदाजे चार ते पाच हजार कोटी रुपयांची बेकायदा गुंतवणूक गोळा केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गायकवाड यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. कंपनीने शेतीपूरक व्यवसाय, खत व कृषी उत्पादनांच्या नावाखाली आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात निधी उभारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून आरोपींची आर्थिक उलाढाल, मालमत्ता आणि गुंतवणुकीचे तपशील तपासले जात आहेत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.