राज्यातील २९ महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात एससी तर कल्याण-डोंबिवलीत एसटी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यातील २९ महानगरपालिकेतील महापौरपदासाठी गुरुवारी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. २९ महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते.
५० टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील १५ महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर १४ ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या ५० टक्के आरक्षणानुसार, ४ महापालिकांमध्ये ओबीसी महिला , तर ९ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान झालं होतं. तर १६ जानेवारीला मतमोजणी झाली होती. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे, याबाबतची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे.
अनुसूचित जमाती – १, अनुसूचित जाती – ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – ८ आणि सर्वसाधारण – १७.
मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग हे ४ सदस्यीय असून काही प्रभाग ३ किंवा ५ सदस्यीय आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत ५२.९४ टक्के, ठाणे मनपात ५६ टक्के, पुणे मनपात ५२ टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये ५८ टक्के, नवी मुंबईत ५७ टक्के, नाशिक मनपात ५७ टक्के मतदान झालंय. परभणीत ६६ टक्के, जालन्यात ६१ टक्के मतदान झालं.